← Back Published on

No War: असं 'या' पॅलेस्टिनी स्त्रिया का म्हणतात?

पॅलेस्टाईनच्या नबी सालेह गावातली केवळ १२ वर्षांची बालिका जना जिहाद ही जगातली सर्वात लहान युद्धभूमीवरची युद्धाचं कवरेज करणारी पत्रकार आहे. सततचे हल्ले, जळती भूमी, धुरांचे लोट, पॅलेट गन्स, आकाशातून टाकले जाणारे बॉम्ब अशा परिस्थितीत जिथे जीवीताची किंचितही हमी नाही तिथे जना राहते. 

इथल्या मुलांना घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला भूमध्य समुद्रही आजतागायत पाहता आलेला नाही. सततच्या बॉम्बहल्ले, धुरामुळे गाझापट्टीवरच्या या लहान मुला – मृलींना आजतागायत स्वच्छ, निरभ्र आकाशही पाहता आले नाही, अशा मुला – मुलींचा आवाज जना जिहाद बनली आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्याआधी थोडं आंतरराष्ट्रीय बालिका दिनाबद्दल. ‘अ स्किल्ड गर्ल फोर्स’ ही या वर्षाची या दिवसासाठीची थीम आहे. मुलींना विशेषत: किशोरवयीन मुलींना विविध प्रकारच्या कौशल्यांनी परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. आताच्या लहान बालिका, किशोरवयीन मुली या उद्याच्या श्रमशक्तीमधला महत्वाचा भागीदार असणार आहेत, त्या अनुषंगाने त्यांना शिक्षणासह विविध कौशल्यांनी सक्षम करणे महत्वाचे आहे. 

आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या अनेक सरकारी, निमसरकारी, खाजगी उपक्रमांमध्ये बऱ्याचदा महिलांना सक्षम करण्यासाठी गृहोपयोगी वस्तू बनवणे, सौंदर्यप्रसाधने, रांगोळी, मेहंदी, कुकिंग, बेकरी उत्पादने, ब्युटीपार्लरचे कोर्सेस व अन्य याच प्रकारच्या उद्योग – व्यवसायांसाठी संधी, मार्गदर्शन, प्रशिक्षण, भांडवल उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जातो. मात्र बालिका, किशोरवयीन मुलींमध्ये किती तरी विविध प्रकारच्या क्षमता, आवडी निवडी असतात, याकडे दुर्लक्ष होते. म्हणूनच युद्धभूमीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून काम करणारी अवघ्या १२ वर्षांची शाळकरी मुलगी पत्रकार, कार्यकर्ती म्हणून जे काम करते, तिची कहाणी चाकोरी मोडणाऱ्या अनेक महिलांसाठी महत्वाची ठरेल. तिची ही कहाणी महिला सक्षमीकरण करणे म्हणजे लोणची – पापड व ब्यूटीपार्लर या पारंपरिक विचारसरणीला छेद देऊन आव्हानं पेलणाऱ्या नव्या अवकाशांबद्दल सांगेल. 

जना जिहादचा जन्म २००६ मध्ये नबी सालेह या गावात झाला. युद्धभूमीवर जन्मल्याने हिंसेचा शापित वारसा जन्मापासूनच तिला मिळाला. तिच्या कुटूंबातल्या अनेक जणांना, मित्र – मैत्रिणींना तिने बॉम्बह्ल्ले, बंदुकींच्या गोळ्यांमुळे जीव गमाववा लागल्याचं तिने लहानपणापासून पाहिलं. यामुळे ती खूप व्यथित व्हायची. आई – वडिलांना प्रश्न विचारायची. आपल्या गावात कुणी पत्रकार कधीच का येत नाही? आपल्या इथली परिस्थिती टीव्ही, पेपरमध्ये का दिसत नाही? असे प्रश्न तिला पडू लागले. यातूनच आपल्या इथे कुणी पत्रकार येत नाहीत, तर आपणच आपली स्थिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हद्वारे जगाला सांगूया, असे तिने मनोमन ठरवले आणि वयाच्या सातव्या वर्षापासून ती फेसबुक लाईव्हद्वारे थेट युद्धभूमीवरचं हिंसक चित्र जगासमोर आणू लागली. आजूबाजूला बॉम्बगोळे, बंदुकींच्या गोळ्या चुकवत, कधी हल्ला झाल्यावर झुडपांच्या मागे जाऊन, मिळेल तो आडोसा घेऊन जीव हातात घेऊन ती पॅलेस्टाईनच्या लढ्याबद्दल, ईझ्रायली सैन्याच्या जुलमांबद्दल रिपोर्टिंग करु लागली. 

सुरुवातीला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तिथली परिस्थिती दाखवणाऱ्या जनाने हळहळू पालकांच्या व तिची चुलत बहीण अहद तमीमी यांच्या मदतीने स्वत:ची वेबसाईट तयार केली. ट्वीटर, फेसपबुक पेजचा वापर करायला सुरुवात केली. जसंजसा तिचा आत्मविश्वास, पालकांचा पाठिंबा वाढत गेला, तसं आपली कौशल्यं अधिक विकसित करुन तिने नवनवं तंत्रज्ञान आपलंसं केलं. छोटे-छोटे लेख लिहीणे, पोस्ट लिहीणे, व्हिडीयोज बनवणे हे सारं शिकत तिने डिजीटल माध्यमांना कवेत घेतलं आहे. जनाचं फेसबुक पेज आज करोडो लोक फॉलो करतात. अनेक मोठ्या माध्यम संस्थांचे वॉर करस्पॉंडंट्सही तिला फॉलो करतात. 

तिचा हा प्रवास समोर आल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिच्या मुलाखती घेतल्या. तिचा प्रवास सांगणाऱ्या काही डॉक्यूमेंटरीजही बनवण्यात आल्या आहेत. जनाला येणाऱ्या आव्हानांचा विचार जरी केला तरी आपण चक्रावून जाऊ. तिची शाळा तिच्या घरापासून पंचवीस मिनिटं दूर असली तरी तिला दोन तास आधी घरातून निघावं लागतं. वाटेत प्रत्येक चेकपोस्टवर मिलीटरीकडून दप्तर चेक करण्यात भरपूर वेळ जातो, असं ती म्हणते. येण्या – जाण्याच्या तासाभराच्या प्रवासासाठी तिचे तीन तास जास्त खर्च होतात, ज्या वेळात तिला खूप वाचता आलं असतं. तिच्यासोबत तिच्या प्रत्येक मित्र – मैत्रिणींनेही कुणाला तरी कायमचं गमावलेलं आहे, या जखमा आम्हाला कधीच विसरता येत नाहीत, असं तिने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. 

जनाची चुलत बहीण अहद तमीमी जी आता केवळ १७ वर्षांची आहे, तिच्यासोबत काही वर्षांपूर्वी इझ्रायली सैनिकाने भर रस्त्यात गैरवर्तन केले होते, त्याचा प्रतिकार म्हणून स्वताच्या रक्षणार्थ तिने त्या सैनिकाला ढकलून दिले, एक थप्पड सैनिकाला लगावली, म्हणून इझ्रायल सरकारने तिला तुरुंगात टाकले होते, जवळपास दोन – अडीच वर्ष तुरुंगातही तिचा प्रचंड छळ करण्यात आला, मात्र अहदही डगमगली नाही, अखेरीस अहदला मुक्त करण्यासाठी जगभरातून इझ्रायलवर आलेल्या दबावामुळे अहदला मुक्त करण्यात आलं. तुरुंगातून बाहेर आल्यावरही त्याच आत्मविश्वासाने अहद ‘फ्री पॅलेस्टाईन’ चळवळीचं काम करत आहे. अशा लढवय्या बहिणीची सोबत जनालाही प्रेरित करते. 

जना सांगते, आम्हाला युद्ध, हिंसा नको तर प्रेम, शांतता हवी आहे, पॅलेस्टाईनच्या मुलांना त्यांचं निरागस बालपण हवं आहे. आम्हाला समुद्र बघायचा आहे, निरभ्र आकाश बघायचं आहे. यासाठीच हिंसा किती वाईट आहे, जीवघेणी आहे, हे मी माझ्या कामातून सांगते. मला मोठं होऊन हावर्ड विद्यापीठातून शिक्षण घ्यायचं आहे, मला जगाला दाखवून द्यायचं आहे, की पॅलेस्टिनी मुली कशातही मागे नाहीत, आणि मला प्रेमाचा संदेश द्यायचा आहे. मोठं होऊन मला आंतराराष्ट्रीय टीव्ही चैनल्समध्ये काम करायचं आहे, युद्धभूमीवरचं खरं आयुष्य कसं असतं, तिथल्या लहान मुलांना कशा – कशाला सामोरं जावं लागतं, हे मला दाखवून द्यायचं आहे. 

खड्या आवाजात ‘वन टू थ्री फोर... ऑक्यूपेशन नो मोर’ अशा घोषणा देणारी, पॅलेस्टिनी लढ्याचा बुलंद आवाज असणारी ही बाल नायिका मनानं हळवी आणि हिंसेचं रुपांतर प्रेमात करणारी आहे, घरांवर दररोज फेकले जाणारे गॅस कॅनस्टर्स (विषारी वायूयुक्त घरांवर फेकलेले कॅन्स, जे नंतर रिकाम्या डब्यांप्रमाणे उरतात), इतस्तत: पडलेल्या बंदुकीच्या गोळ्या जमा करुन तिने तिच्या घराबाहेरची बाग सजवली आहे. बंदुकीच्या गोळ्या, गॅस कॅनस्टर्स यांचा वापर करुन सुंदर माळा तयार करुन बागेत लावल्या आहेत. हिंसेसाठी वापरलेल्या शस्त्रातूनही काही सौंदर्य – प्रेम – शांततेची निर्मिती करता येते, हे मला जगाला सांगायचे आहे. या माझ्या बागेमुळे आमचं जीवन कसं आहे, हेही येणाऱ्या पिढ्यांना, जगाला कळेल असं ती म्हणते. जीवीताची हमी नसताना अवघ्या बारा वर्षांची ही बालिका युद्धभूमीवरचं जीवन लोकांना सांगण्यासाठी कसा संघर्ष करते, आपल्या हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करत नित्य नवी आव्हानं भेदत एका शांततामय युगासाठी कार्य करते, हे निव्वळ प्रेरणादायी नाही, तर प्रत्येकाला भारावून टाकणारे आहे.