← Back Published on

कार्ल मार्क्सच्या जयंतीनिमित्त मुंबईत 'असा' साजरा झाला भंडारा

साम्या कोरडे या तरुण 'राजकीय' कार्यकर्तीनं ५ मे २०२५ रोजी धारावीत कार्ल मार्क्सच्या जयंतीनिमित्त भंडारा आयोजित केला होता. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. यंदाचा हा दुसरा अशा प्रकारचा कार्यक्रम. दोन्ही वर्षी मी या कार्यक्रमाला गेले होते, त्यामुळे या महत्वाच्या कार्यक्रमाबद्दल काही नोंदवून ठेवावंसं वाटलं. 

पाच तारखेला झालेल्या कार्यक्रमात अंदाजे दीड हजारपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. धारावीतले सर्व जाती-धर्माचे कष्टकरी लोक प्रामुख्याने आले असले तरी मुंबई आणि उपनगरातली इतर समविचारी मित्र-मैत्रिणीही आले होते. वेज-नॉन वेज असं दोन्ही प्रकारचं - मोजका मेनू असलेलं उत्तम जेवण होतं. लोक येत होते, स्टेजवर तरुण मित्र-मंडळी सादर करत असलेली परिवर्तनवादी गाणी ऐकत होते, गप्पा मारत होते, जेवत होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्क्सच्या फोटोला फुलांचा हार घातल्यावर साम्याने माईकवरुन लोकांना आवर्जून सांगितलं की हा मार्क्स बाबा कष्टकऱ्यांचा नेता असला तरी त्याला हात जोडून नमस्कार करायचा नाही, पाया पडणे इ. करायचं नाही, तर हात ऊंचावून जिंदाबाद म्हणत अभिवादन करायचं. त्यानंतर परिवर्तनवादी गाणी स्टेजवर सादर होऊ लागली. गाण्यांच्या अध्ये-मध्ये साम्याने मार्क्सचे विचार सांगणऱ्या छोट्या छोट्या हिंदी परिच्छेदांचं वाचन केलं. हे परिच्छेद सर्वसामान्यांना समजतील अशा सोप्या भाषेत होते. खरं तर ज्यांना आधीच कार्ल मार्क्स थोडा माहित आहे, अशांना गोळा करुन अभ्यासवर्गात द्वंत्वात्मक भौतिकवाद सांगणं सोपं आहे, पण अशा प्रकारे मोठ्या संख्येत लोकांना एकत्रित करुन त्यांना सोप्या भाषेत मार्क्सवादाची, मार्क्सची ओळख करुन देणं अवघड, आव्हानात्मक आहे. साम्या हे घडवून आणण्यासाठी प्रामाणिक धडपड करते आहे.

या कार्यक्रमाबद्दल कळल्यानंतर धारावीतल्या मदरशात शिकवणारे एक मौलाना साम्याकडे गेले, त्यांनी कार्यक्रम काय आहे, हे समजून घेतलं आणि त्यांच्या मदरशातल्या एका दहा वर्षीय मुलीकडून मार्क्ससंबंधी एक छोटंसं भाषण तयार करुन घेतलं. त्या लहानग्या मुलीनं हे भाषण तिथं सादर केलं. मार्क्स कसा पत्रकार, लेखक, विचारवंत होता आणि त्यानं भांडवलशाहीला का विरोध केला, असे मुद्दे थोडक्यात सांगणारं ते इंग्रजीतलं भाषण. अशा कार्यक्रमात एका मौलानांना आपल्या विद्यार्थिनीसोबत सहभागी व्हावंसं वाटणं, हे या कार्यक्रमाचं किती तरी मोठं यश आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी नागरिकांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते प्रकाश रेड्डी, अनुराधा रेड्डी, सुबोध मोरे, शैलेंद्र कांबळे, उदय चौधरी, पत्रकार समर खडस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठनचे दत्ता बाळसराफ, लेखक-कवी अक्षय शिंपी, अविनाश उषा वसंत, तरुण कार्यकर्ता शंबुक संकल्पना उदय असे लोक आले होते. अनेक तरुण कार्यकर्ते, कलाकार आले होते. मा. खासदार हुसेन दलवाईसुद्धा आवर्जून शुभेच्छा देऊन गेल्याचं सामान्यं सांगितलं. विद्यमान खासदार अनिल देसाई हेही कार्यक्रमाला उपस्थित राहून, शुभेच्छा देऊन गेल्याचं साम्यानं सांगितलं. मला जायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काही गोष्टी मिस झाल्या, त्याचे फोटो-विडिओ साम्यानं पाठवले. 

कार्यक्रमाच्या शेवटाकडे - मंडप डेकोरेटर्स, केटरिंग कर्मचारी अशा सगळ्यांचे नुसते माईकवरुन आभार मानले गेले नाहीत, तर साम्याने त्यांना स्टेजवर बोलावून त्यांचा सत्कार करत त्यांच्या श्रमाचं महत्व अधोरेखित केलं. धारावीतले मराठी तसंच उत्तर आणि दक्षिण भारतीय, विविध जाती-धर्माचे लोक आणि अनेक मुस्लीम स्त्रिया-पुरुष, तरुण, कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी साम्याला जोरदार साथ दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र जो इस्लामोफोबिया उफाळून आला आहे, त्या पार्श्वभूमीवर इथं सर्वांमध्ये दिसलेला एकोपा आणि प्रेम यानं खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. कधी प्रत्यक्ष साम्यानं आयोजित केलेल्या कोणत्या कार्यक्रमात गेलात तर तिच्या अफाट ऊर्जेचा नि संघटन कौशल्याचा प्रत्यय तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही. 

आता थोडं मार्क्सच्या दैवतीकरण हिंदुकरणाबाबतच्या आरोपांबद्दल. मुळातच या कार्यक्रमातल्या मार्क्सच्या तसबिरीला कुणीही भस्म, गंध, अबीरबुका, गुलाल, हळदी-कुंकू असं काहीही लावलं नव्हतं. हे माझ्यासारखे शेकडो प्रत्यक्षदर्शी सांगतील, तरीही सोशल मीडियावर - कपाळावर भस्म लावलेला जो मार्क्सचा फोटो पसरवला गेला आहे, तो खोडसाळपणे आणि खोटं-नाटं पसरवण्याच्या स्पष्ट उद्देशानं - एडिट करुन पसरवला गेला आहे. ना मूळ कार्यक्रमपत्रिकेत असा फोटो होता, ना प्रत्यक्ष कार्यक्रमात असं काही झालं. कुणीही मार्क्सच्या पाया पडलं नाही. स्टेजवर जाताना कुणी चपला काढल्या नाहीत. जेवताना वेज-नॉन वेज खाणारे लोक एकत्र बसून जेवत होते, वेज-नॉन वेजसाठी वेगळे सेक्शन- वगैरे असं काही नव्हतं. धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमात - जे जे निर्बंध दिसतात, त्याचा इथं दुरान्वयेही संबंध नव्हता. इथे भंडारा याचा अर्थ सहभोजन असा आहे. सर्वांनी एकत्र येऊन एका महत्वाच्या दिवशी काही सेलिब्रेशन करणे आणि एकत्र जेवणे - इतकं साधं. 

साई भंडारा, देवादिकांचे भंडारे याच्याशी तुलना करणाऱ्यांनी लोकांनी एक तर त्या भंडाऱ्यांचाही नीट अभ्यास केलेला नाही आणि साम्यानं आयोजित केलेल्या भंडाऱ्याचीही नीट माहिती घेतली नाही. देवादिकांच्या भंडाऱ्यात - सव्वाच्या पटीत (उदा., सव्वा अकरा, सव्वा एकवीस किलो) धान्यांचा स्वयंपाक करतात, सवाष्ण जेवायला घालतात, ब्राम्हणाचा शिधा-दान दक्षिणा, गायीला घास, होम-हवन अशा शंभर गोष्टी असतात. लोकांकडून, दुकानदारांकडून वर्गणी गोळा केली जाते. महाप्रसाद, अन्नदान असे शब्द वापरले जातात. साम्यानं आयोजित केेलेल्या कार्यक्रमात असलं काहीही कधीच झालं नाही, तिथं कुणी ‘अन्नदान’ करणारं नव्हतं, की कुणी वर्गणी देणारं. कार्यक्रमाच्या खर्चाचीही साम्याकडून माहिती घेतली, तर समविचारी मित्रांनी आपणहून यशाशक्ती या कार्यक्रमाकरता योगदान दिल्याचं, उर्वरित खर्च तिचे बाबा राजू कोरडे यांनी केल्याचं कळलं. तसंच लोकांच्या आदर-सत्कार इ. बाबींकरता स्थानिक कार्यकर्ते आणि लोकांनी मदत केल्याचं कळलं. या पार्श्वभूमीवर ‘भंडारा’ हा मास अपील असलेला शब्द वापरला-त्या माध्यमातून मार्क्सला सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याची धडपड करण्याचं कौतुक करायचं की केवळ एका शब्दाच्या वापरामुळे - मार्क्सचं दैवतीकरण, ब्राम्हणीकरण असे आरोप आपल्याच माणसांनी करायचे? नाठाळांच्या माथी सत्याची काठी हाणायची की त्यांनी पसरवलेल्या खोट्या, एडिटेड फोटोंच्या आधारे (जराही फॅक्ट चेक न करता) मार्क्सचं दैवतीकरण, ब्राम्हणीकरण, हिंदुकरण होत असल्याचा उच्चारव करायचा, हे ज्याचं त्यानं ठरवावं. 

आता कुणी असंही म्हणेल की मार्क्सला ‘बाबा’ करुन टाकलं. त्याची काय गरज? अशांच्या मराठी भाषेच्या अज्ञानापुढे हसावे की रडावे? साम्याने वापरलेला ‘बाबा’ हा शब्द कोणत्या आश्रमी बाबाच्या अर्थाने नसून - तो पितृतुल्य अशा अर्थानं आहे. ज्यांच्या शास्त्र-काट्याच्या कसोटीत ‘बाबा’ ह्या शब्दाला जागा नाही, त्यांनी नारायण सुर्वेंची ‘माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला.’ ही कविता वाचली नसेल तर जरुर वाचावी. अविरत कष्ट करणाऱ्या, पुस्तकं वाचण्याची, अभ्यासवर्गात जाण्याची लक्झरी ज्यांना नाही, ज्यांना मार्क्स कोण? हे माहीत नाही अशांना सुरुवातीला ‘कार्ल मार्क्स’पेक्षा ‘मार्क्स बाबा’ जास्त रिलेट होईल, जसा तो सुर्व्यांच्या कवितेतल्या जानकी अक्काला रिलेट झाला. तुम्हाला-मला मार्क्स माहीत आहे, आपल्यासारख्यांना तो माहीत व्हावा, हा साम्याचा उद्देशच नाही. तिला धारावीतल्या हजारो जानकी अक्कांपर्यंत मार्क्स पोचवायचा आहे, ही स्पष्टता आणि राजकीय भान तिला आहे. अर्थातच ही पोस्ट केवळ एका कार्यक्रमापुरती आहे. असा भंडारा आयोजित करणं - हे साम्या करत असलेल्या शंभर कामांपैकी एक काम आहे. तिच्या प्रत्यक्ष जमिनीवरच्या कामाची मला असलेली माहिती सांगायची म्हंटली तरी स्वतंत्र लेख लिहावा लागेल. जोवर साम्यासारखे लोक काम करतायत तोवर मार्क्सच्या ‘हिंदुकरणाची’ चिंता करायची मुळीच गरज नाही. 

मार्क्सच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यासारख्या महत्वाच्या सांस्कृतिक उपक्रमांबद्दल अनेक मतप्रवाह असू शकतात, त्यावर साधक-बाधक चर्चाही व्हावी, मात्र असे चांगले उपक्रम करणाऱ्या तरुणांवर आरोप करण्याआधी, सत्य जाणून घेणं, आपल्या समोर मांडल्या जाणाऱ्या सोशल मीडियावरील खोट्यानाट्या नॅरेटिव्जची सत्यता मात्र तपासून घेणं फार महत्वाचं आहे. 

Karl Marx Mumbai Dharavi Samya Korde Culture Food Culture Maharashtra